श्रीमद्भागवत स्कंध आठ ( Srimad Bhagavat Skandha Aath )
Description
श्रीमद्भागवत हे तत्त्वज्ञानात्मक महाकाव्य आणि अभिजात साहित्य असून विशाल भारतीय साहित्य-दालनामध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. वेदांमध्ये भारताचे कालातीत विज्ञान प्रकट झाले आहे. वेद मानवी ज्ञानातील सर्व शाखांना स्पर्श करतात. मूलत: श्रुतिपरंपरेमध्ये जतन करण्यात आलेले वेदांचे हे ज्ञान सर्वप्रथम लिपिबद्ध केले ते श्रील व्यासदेवांनी आणि यासाठीच व्यासदेवांना भगवंतांचा साहित्यावतार म्हणून ओळखले जाते. तत्पश्चात त्यांचे गुरू नारद मुनी यांनी त्यांना श्रीमद्भागवताच्या रूपाने वेदज्ञानाचे सार-संकलन करण्याची प्रेरणा दिली. वैदिक साहित्यरूपी वृक्षाचे परिपक्व फळ म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीमद्भागवत वैदिक ज्ञानाचे सर्वांत परिपूर्ण आणि अधिकृत स्पष्टीकरण आहे. श्रीमद्भागवताची रचना केल्यानंतर व्यासदेवांनी ते आपल्या पुत्राला, शुकदेव गोस्वामींना शिकविले. पश्चात श्रील शुकदेवांनी पवित्र गंगाकाठी एकत्र आलेल्या ऋषिसमुदायात ते परीक्षित महाराजांना सांगितले. परीक्षित महाराज हे जगाचे सम्राट आणि एक राजर्षी होते. आपणास सात दिवसांत मृत्यू येणार असल्याचे समजताच त्यांनी संपूर्ण राज्याचा त्याग करून ते दिव्य साक्षात्काराचा मार्ग शोधण्याकरिता गंगेच्या काठी जाऊन बसले. परीक्षित महाराजांचे प्रश्न आणि श्रील शुकदेव गोस्वामींनी दिलेली आत्म्याच्या स्वभावापासून ते विश्वाच्या उगमासंबंधातील परिपूर्ण उत्तरे हा श्रीमद्भागवताचा आधार आहे. संपूर्ण अनुवाद आणि विद्वत्तापूर्ण विस्तृत तात्पर्ये असणारी श्रीमद्भागवताची ही जगातील पहिली आणि एकमेव आवृत्ती आहे. आजमितीला ही सर्वत्र उपलब्ध आहे. श्रीमद्भागवताचे हे प्रकाशन म्हणजे कृष्णकृपामूर्ती ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या विद्वत्तापूर्ण भक्तिमय प्रयत्नाचे फळ आहे. श्रील प्रभुपाद हे भारतातील धार्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक विचारधारेचे जगद्विख्यात आचार्य आहेत. त्यांची संस्कृतातील विद्वत्ता आणि वैदिक संस्कृतीविषयी असणारी त्यांची जाण या दोन्हीही गोष्टींमुळे पश्चिमी जगासमोर या महत्त्वपूर्ण अभिजात ग्रंथाचे एक सुंदर स्पष्टीकरण उभे राहते. या ग्रंथात मूळ संस्कृत श्लोक, त्यांचे शब्दार्थ, त्यांचा अचूक अनुवाद आणि त्यांवरील विस्तृत तात्पर्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे ही आवृत्ती विद्वज्जन, विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांना सारखीच आकर्षक ठरेल. भक्तिवेदांत बुक ट्रस्टने वाचकांच्या हाती दिलेले हे सर्वश्रेष्ठ साहित्य भविष्यकाळात अनेकानेक वर्षांपर्यंत आधुनिक मानवाच्या बौद्धिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करील.